अवैध वाळू उपसा भोवला;मंडळ अधिकारी, तलाठी सस्पेंड..

Spread the love

परभणी जिल्हाधीकारी संजयसिंह चव्हाण यांचे आदेश; पुर्णा तालुक्यातील सातेफळ येथील गोदा पात्रात अवैध रेती उपशा प्रकरण;महसूल विभागात खळबळ

पूर्णा,ता.९/(प्रतिनिधी) :

तालुक्यातील कावलगांव मंडळाचे  मंडळ अधिकारी जी.एस.साखरे तसेच सातेफळ, आलेगांव सज्जाच्या तलाठी प्रज्ञा गायकवाड यांना सातेफळ येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या रेती उपसा प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निलंबित केले.तसे आदेश(ता.७) सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती महसूल विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

     पुर्णा तालुक्यातील सातेफळ येथील जुने गावठाण, ग क्रमांक १० लगतच्या गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा होत असल्याची तक्रार मारोती लोखंडे व इतर ग्रामस्थांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी केली होती. त्यानुसार जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, नदीपात्रात सुमारे १०० ते १२५ ब्रास रेतीचा अवैध साठा आणि पाण्यात रेती उपशा साठी वापरण्यात येणारे आठ ते दहा लहान-मोठे तराफे आढळले होते. घटना स्थळांवरुन पंचनामा करून रेतीसाठा जप्त देखील करण्यात आला होता.

या प्रकरणी तपासणी करीता आलेल्या पथकाने दिलेल्या अहवालानुसार, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चा भंग करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत  ७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) अन्वये संबंधित मंडळ अधिकारी साखरे व तलाठी गायकवाड निलंबनाचे स्वतंत्र आदेश जारी केले आहेत.निलंबन काळात दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, पूर्णा येथे राहणार असून, तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच खासगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.अवैध रेती उपशाच्या या प्रकरणातील दुहेरी निलंबन कारवाईमुळे तालुक्यातील गौण खनिज उत्खननावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले गेले आहे.

You cannot copy content of this page