पेन्शन घोटाळ्यातील BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना अटकपूर्व जामीन
पूर्णा पं स घोटाळा प्रकरण;पाठक आणि भिसे कोठडीतच;अन्य ४ जणं पसारच
पूर्णा(प्रतिनिधी)२४ जानेवारी
पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील पेन्शन घोटाळा प्रकरणात दोषीं असलेल्या BDO वानखेडे व मोडकेसह तिघांना परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने दि.२४ रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे.मागील पंधरा दिवसांपासून तत्पकालीन दोन्ही बीडीओ पसार झाले होते.पसार असलेल्या ७ जणांपैकी तिघांना न्यायालयाने तात्पुरता का होईना मात्र दिलासा दिला आहे.तर लेखा विभागातील संजय पाठक, मंचक भिसे न्यायीक कोठडीत असल्याची माहिती आहे.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधीमध्ये सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांचा पेन्शन घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी पं.सचे विद्यमान गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी अखेर पूर्णा पोलिस ठाण्यात ता.७ जानेवारी रोजी तत्कालीन दोन बिडीओ श्रीमती सुनिता वानखेडे व जे व्ही मोडके यांच्यासह एकूण ९ जणांवर शासकीय निधीचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.यानंतर घटनेतील दोषी लेखाविभागातील संजय पाठक व भिसे यांना चोवीस तासांत जेरबंद करुन न्यायालयासमोर हजर केले होते. त्यात त्यांना काही दिवस पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याप्रकरणातील सह आरोपी असलेले जयश्री टेलरींग, सोनाजी भोसले, शेख अझहर समद, नागेश नावकीकर हे मात्र पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार आहेत.
घोटाळा प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.जर पोलीसांनी याप्रकरणी योग्य दिशेने तपास केला तर पंचायत समितीतील अन्य प्रकारही आपसुकच उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.