भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला उडवले;भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी
पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील घटना; जखमी माखणी येथील रहिवाशी;एकाची प्रकृती चिंताजनक
पूर्णा(प्रतिनिधी)
नांदेडकडे भरधाव वेगाने निघालेल्या एका आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळील सावली धाब्याजवळ रविवारी ता.९ रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून डोक्यास गंभीर ईजा झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवाजी शंकर गाडे वय ५० वर्ष तसेच राम नेमाजी गाडे वय ४५ वर्ष दोघे रा.माखणी ता.पूर्णा जि.परभणी असे अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की, दुचाकीवरील दोघे जखमी हे रविवारी नांदेड येथे एका विवाह सोहळ्यास हजेरी लावून परत आपली दुचाकी क्र.एम.एच.२२/एक्यु/७७०८ वरून चुडावा, पूर्णा,ताडकळस मार्गे माखणीकडे जात असताना सायं ५ वाजण्याच्या सुमारास पूर्णा-नांदेड महामार्ग क्र.६१ वरील चुडावा गावाजवळ असलेल्या सावली धाब्यासमोर पूर्णेकडून भरधाव वेगाने निघालेल्या आयशर ट्रक क्र.एम.एच.१२/टी/१८३५ याने समोरुन येत असलेल्या गाडे बंधुच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.यावेळी घडलेल्या अपघातात शंकर गाडे यांच्या डोक्यास मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते.तर राम गाडे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.अपघात घडल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आसिफ पठाण व गंगाधर हुरणे या तरुणांनी तातडीने जखमींना पूर्णा येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथिल डाॅक्टरांनी दोन्ही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे. दरम्यान चुडावा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोहेकाॅ. आनंदा तोंडेवाड पोहे ,पोहेकाॅ. दत्ता काकडे,पोकाॅ.अनिल मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन ट्रकचा चालकास तब्येत घेतली असल्याची माहिती आहे पुढील तपास चुडावा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरसिंह पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.