चुडावाचे पो.कॉ. चंद्रमुनी हनवते यांना हवालदारपदी पदोन्नती
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेश; सेवाज्येष्ठतेच्या आधारे ११ महिन्यांसाठी तात्पुरती पदोन्नती
पूर्णा | प्रतिनिधी
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या तात्पुरत्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले असून, त्यामध्ये चुडावा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई चंद्रमुनी विश्वनाथ हणवते (बकल क्रमांक १२८८) यांची पोलीस हवालदार पदावर तात्पुरती पदोन्नती करण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे चुडावा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.३ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस शिपाई चंद्रमुनी हणवते यांच्यासह पोलीस मुख्यालय, परभणी येथे कार्यरत महिला पोलीस शिपाई प्रतिभा शंकरराव जाधव (बकल क्र.३९२) यांनाही पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नत्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे तसेच रिक्त पदांच्या अनुषंगाने करण्यात आल्या आहेत.शासनाच्या नियमानुसार संबंधित पदोन्नती ११ महिन्यांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली असून, पदोन्नतीनंतर दोन्ही कर्मचाऱ्यांची सध्या ज्या ठिकाणी नियुक्ती आहे, त्याच ठिकाणी त्यांची नेमणूक कायम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जारी केले आहेत.











