१ ऑगस्ट पासून परभणी पोलिसांचे’ऑपरेशन जरब’
पो.अ.पंकज कुमावत यांची संकल्पना;सराईत गुन्हेगारांवर राहणार करडी नजर;सुरक्षित, निर्भय आणि गुन्हेमुक्त जिल्ह्यासाठी विशेष मोहीम
परभणी, ता. २८ (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, निर्भय आणि गुन्हेमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परभणी जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन जरब’ ही विशेष मोहीम येत्या १ ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या संकल्पनेतून सुरू होणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्हाभरातील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, वारंवार गुन्हे करणारे आरोपी, फरार आरोपी, गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर मुक्त असलेले आरोपी तसेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान अशा संशयित व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हालचालींवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करून गुन्ह्यांची पुनरावृत्ती रोखण्यावर भर दिला जाणार आहे. कायद्याचा धाक निर्माण करत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ‘ऑपरेशन जरब’हा उपक्रम केवळ गुन्हेगारांवर कारवाई करण्यापुरता मर्यादित नसून, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ करणे आणि जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करणे, हा त्यामागील व्यापक हेतू आहे.
याचबरोबर परिसरात संशयित व्यक्ती, सराईत गुन्हेगार किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन परभणी जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











