Breking;महादेव जानकरांची साडेचौदा कोटींची फसवणूक.!
गंगाखेड,ता.२९| प्रतिनिधी
गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची पनवेल येथील मालमत्ता खरेदी व्यवहारात तब्बल ₹14 कोटी 49 लाख 85 हजार 975 रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे स्वीकारूनही मालमत्ता नावावर करून न देता उलट जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोळखे येथील गट क्रमांक 81, 82 आणि 83 मधील मालमत्ता विक्रीसंदर्भात मुंबईस्थित टोटल लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक प्रवीण गुप्ता यांनी महादेव जानकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत संबंधित मालमत्तेतील दोन हिस्से महादेव जानकर आणि राजाभाऊ फड यांना विक्री करण्याचे निश्चित झाले.यानंतर 15 जानेवारी 2025 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीत मुंबई तसेच आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या फार्महाऊसवर रोख रक्कम आणि आरटीजीएसद्वारे मिळून ₹14.49 कोटी स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे. या बदल्यात सुमारे 50 टक्के हिस्सा, म्हणजेच 49 गुंठे जागा, ज्यामध्ये पाच वेअरहाऊस, एक साडी शॉपचे बांधकाम आणि मोकळी जागा समाविष्ट आहे, ₹15 कोटींना विक्री करण्याचे ठरले होते.
खरेदीखताऐवजी जीवे मारण्याची धमकी
फिर्यादीनुसार, संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही संबंधित मालमत्तेचे खरेदीखत किंवा फेरफार करून देण्यात आला नाही. राजाभाऊ फड यांनी वारंवार संपर्क साधून व्यवहार पूर्ण करण्याची मागणी केली असता, प्रवीण गुप्ता यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.«”परत फोन केला किंवा माझ्याकडे आलास तर तुला सोडणार नाही. जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नको. व्यवहार विसरून जा, अन्यथा तुझी हत्या होईल,” अशी धमकी दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.»
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी राजाभाऊ श्रीराम फड (रा. बनपिंपळा, ता. गंगाखेड) यांनी 25 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून प्रवीण गुप्ता, मंजू गुप्ता, अंकित गुप्ता आणि संजना गुप्ता (सर्व रा. मुंबई) यांच्याविरुद्ध विश्वासघात, फसवणूक आणि धमकीसह संबंधित कलमांन्वये गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत असून, या बहुचर्चित आर्थिक व्यवहाराकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हे आरोप फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून, पुढील तपासानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.











