‘पोक्सो’ प्रकरणातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या.!
परळी आरटीआय परिसरातातील घटना; गुन्हा दाखल झाल्यानंतर होता बेपत्ता;शहरात खळबळ
परळी वैजनाथ, ता. २९ (प्रतिनिधी) :
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात बुधवारी सकाळी एका १८ वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
प्राथमिक तपासात मृताची ओळख आकाश राम खाटिक (वय १८, रा. दादाहरी वडगाव, ता. परळी)अशी पटली. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश खाटिक याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत होते.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आकाशचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. मात्र या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच पार्श्वभूमीवर मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाशविरुद्ध विविध कलमांखाली तसेच ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात त्याच्यावर घरात घुसून हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला होता.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६६/२०२६ नोंद असून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह ‘पोक्सो’ कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आकाश गावातून निघून गेला होता. त्याचा शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह परळी शहरातील आयटीआय परिसरात आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.दरम्यान, ही आत्महत्या आहे की मृत्यूमागे अन्य काही कारण आहे, याबाबत पोलीस कोणताही निष्कर्ष काढण्यास तयार नसून सर्व शक्यतांचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच संबंधित गुन्ह्याचा तपास आणि मृत्यूची कारणमीमांसा या दोन्ही बाबींची स्वतंत्रपणे चौकशी केली जात असून उत्तरीय तपासणी अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.











