पूर्णेत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी बाबत व्यवस्थापन कार्यशाळा

Spread the love

एचएआरसी संस्थेच्या डॉ.सौ आशा चांडक यांचे मार्गदर्शन; वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची ५९ पुस्तके भेट
पूर्णा(प्रतिनिधी)
एचएआरसी संस्थेच्या डॉ.सौ आशा चांडक यांनी पूर्णा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना व महिलांना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.हि कार्यशाळा शुक्रवारी ता.१४ रोजी पार पडली.यावेळी संस्थेच्या वतीने मार्गदर्शनसह विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची ५९ पुस्तकेही भेट दिली.
     पूर्णेतील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय येथे ६ वी ते १२ वितील किशोरवयीन मुलींसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएचआरसी) संस्थे तर्फे करण्यात आले होते.तसेच यावेळी संस्थेच्या वतीने ११ व‌१२ वीत विज्ञान शाखेत शिकत असलेल्या मुलींना नीट व सीइटी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीकक्षेची ५९ पुस्तकेही भेट दिली.
या प्रसंगी १५० किशोरवयीन मुली, महिला शिक्षकांची उपस्थिती होती. दुपारी २ते ४ दरम्यान आयोजित सत्रात एचएआरसी संस्थेच्या मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ. सौ आशा चांडक, एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, अन्नपूर्णा पुरी, गृहप्रमुख प्रतिभा भद्रे,अनिता कातोरे, एस एन अर्जुने आदींची उपस्थिती होती.  प्रस्तावना अन्नपूर्णा पुरी यांनी केली आभार प्रतिभा भद्रे यांनी मानले.

You cannot copy content of this page