स्थानिक स्वराज्य निवडणुक;सुनावणीला पुन्हा खो..
महासमाचार न्युज नेटवर्क;
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुनावणीला आजही स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज (२५ फेब्रुवारी २०२५) होणार होती, परंतु ती आता पुढे ढकलली गेली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी चार- चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही. देशात लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात काय झाले, याबद्दल विचारणा केली होती. त्यावर दोन्ही बाजूंकडून याबाबत स्पष्टता आल्याचे सांगण्यात आले होते. राज्य सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी १ तास तर याचिकाकर्त्यांनी अर्ध्या तासाचा वेळ मागितला होता. आजच्या सुनावणीत या संदर्भातले युक्तिवाद पूर्ण झाले तर हा विषय मार्गी लागून येऊन निवडणुका एप्रिल- मे मध्ये होण्याची शक्यता होती. मात्र आजच्या सुनावणीला खो बसल्याने निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.












