रेल्वेखाली सापडून ३६ वर्षीय प्रवाशी तरुणाचा मृत्यू
पूर्णा स्थानक परिसरातील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
पूर्णा(प्रतिनिधी)
परभणी येथून नांदेडकडे जात असलेल्या एका ३६ वर्षीय प्रवासी तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पूर्ण रेल्वे स्थानक परिसरात ता.२४ एप्रिल गुरुवारी रात्री ११ ते साडेअकराच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पूर्णा येथील लोहमार्ग पोलीसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घनश्याम उर्फ गणू किशनराव अहिरे वय ३६ वर्षे रा.भिमनगर असे त्या मयत प्रवासी तरुणाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ड्युटीवरील तैनात रेल्वे स्टेशन मास्तर यांनी येथील लोहमार्ग पोलिसांना खबर देऊन कळविले की पूर्णा रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ पासून परभणीच्या दिशेने असलेल्या ३१८/२७ मैल अंतराच्या जवळ एक तरुण कोणत्यातरी अज्ञात रेल्वे खाली सापडून दगावला आहे. पुढील योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्यावरून लोहमार्ग पोलीस स्थानकातील पोहेकाॅ दिगंबर राठोड ,पोकाॅ.सुभाष चव्हाण, पोकाॅ. अविनाश डावरे, होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळ गाठून तातडीने मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेहाचा घटना स्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना मयताचे खिशात एक आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच परभणी ते नांदेड दरम्यानचे रेल्वे तिकीट आढळून आले. पोलिसांनी त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता नातेवाईकांनी सांगितले नुसार सदरील तरुण हा काही खाजगी कामानिमित्त परभणी येथून नांदेड कडे जात होता दरम्यान तो कोणत्यातरी अज्ञात रेल्वे खाली सापडून त्याचा मृत्यू झाला असावा असे त्यांनी पोलिसांना सांगितले.यानंतर घटना स्थळांवरून मृतदेह ताब्यात घेऊन पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला उत्तरीय तपासणी करून मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.याप्रकरणी पूर्ण लोहमार्ग पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकाॅ दिगंबर राठोड हे करीत आहेत सदरील तरुणावर शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.