संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल -अवधूत महाराज टाकळीकर
पूर्णेत भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पूर्णा प्रतिनिधी
आधुनिकतेच्या नावावर आपण आपले संस्कार विसरत चाललो आहोत.आपल्या सण उत्सव व संस्काराची माहिती आपल्या मुलाबाळांना द्या कारण संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल म्हणून संस्कार टिकवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वेदशास्त्री भागवताचार्य अवधूत महाराज टाकळीकर यांनी केले.
ब्राम्हण महासंघ पूर्णा शाखेच्या वतीने मंगळवारी शनी मंदिर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या वेळी अध्यक्ष्यस्थानी समाजातील ज्येष्ठ गोपाळराव कुलकर्णी हे उपस्थित होते.
भगवान परशुराम यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाची माहिती त्यांनी सांगितली.तसेच सौ कावेरी जोशी यांनी भगवान परशुराम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
भगवान परशुराम यांच्या प्रतिमेची आरती मंत्र उपचाराने करण्यात आली. पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.हरिभाऊ पाटील,प्रास्ताविक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रशांत कुलकर्णी तर आभार मधुकर जोशी कानखेडकर यांनी केले.या वेळी शहरातील ब्रह्मवंद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रशांत कुलकर्णी, गोविंद चौधरी ,सतीश टाकळकर, गिरीश जोशी, श्रीकांत आहेरवाडकर, मकरंद कुलकर्णी, लक्ष्मण वांगे ,अभिजीत चिटणीस आदींनी परिश्रम घेतले