पूर्णा-झिरोफाटा राज्य रस्त्याच्या कामाला सुरुवात;महासमाचारच्या पाठपुराव्याला यश
१७ कि.मी डांबरीरस्त्याच्या पृष्ठभागाच्या नुतनीकरण;सा.बां विभागाचा नागरिकांना दिलासा
पूर्णा(प्रतिनिधी)
सा.बां विभागाने दै.महासमाचारच्या वृत्ताची दखल घेत पूर्णा तालुक्यातील प्रमुख रस्ता असलेल्या खड्डेमय झिरोफाटा ते पूर्णा १७ कि.मी राज्य रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाच्या नुतनीकरणाला शुक्रवारी १६ में रोजी सुरुवात केली असुन खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करणा-या वाहनधारकांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परभणी,हिंगोली,नांदेड जिल्ह्याला जोडल्या जाणाऱ्या पूर्णा-झिरोफाटा राज्य रस्ता क्र.२४९ चे रुंदीकरण,मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम सन २०१७-१८ साली केंद्रीय रस्ते अनुदान योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आले होते. मागील एक ते दिड वर्षात रस्त्यावर डांबर उखडून गेल्याने चर, खड्डे, तसेच जागोजागी रस्ता दबला गेला होता.यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.रस्त्यावर पडलेल्या चर मुळे तर अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या.दरम्यान सदरील रस्त्याचे नवनिर्माण करावे अशी मागणी अनेकांकडून होत होती.सा.बां विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांनी याप्रकरणी कार्यालयीन कार्यवाही करत या रस्त्याच्या डांबरपृष्ठभागाच्या नुतनीकरण कामाला मंजुरी मिळवून घेतली.या रस्त्यावरील खड्डे बुजवून पूर्णा ते झिरो फाटा दरम्यान सुमारे १७ किमी रस्त्यावर डांबरीकरण करुन नवनिर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे.यासाठी सा.बां विभागाच्या वतीने १३ कोटीं रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे समजते.ता.१६ मे शुक्रवारी उपकार्यकारी अभियंता संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात करण्यात आली असून सदरील काम येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण होणार असल्याचे समजते.सहा अभियंता शिंदे, उपस्थित होते.यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले की, निधी अभावी संबधीत रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे काम रखडले होते.संबधीत कामास शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.रस्त्याचे काम दर्जेदार करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचे कामावर पुर्ण लक्ष राहणार आहे.तशा सुचनाही संबंधितांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.