मोटरसायकलच्या धडकेत युवकाचा मुत्यू
राहाटी येथील घटना;ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ताडकळस/प्रतिनिधी
परभणी ते वसमत रस्त्यावर राहटी शिवारात वसमतकडून येणाऱ्या मोटरसायकल चालकाने जोरदार धडक दिल्याने लिंगी येथील ४५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मुत्यू झाला. या प्रकरणी शनिवार (दि. १७) रोजी ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी मोटर सायकल क्र. एमएच ३८ एई ५५१४ चालक नाव, गांव माहित नाही. यांनी १३मे रोजी संध्याकाळी ८: ४५ वाजण्याच्या सुमारास विश्वशांती शाळेसमोर राहटी शिवारात झालेल्या अपघातात लक्ष्मण नागोराव बोंदकुले (वय ४५) रा. लिंगी ता. वसमत जि. हिंगोली यांचा मृत्यू झाला.
याविषयीची फिर्याद जगदीश जळबाजी बोंदकुले रा. लिंगी ता. वसमत यांनी दिली आहे. यावरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आप्पाराव व-हाडे हे पुढील तपास करीत आहेत.
__________________