३९ वर्षीय महीलेची गळफास लावून आत्महत्या
पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव वाडी येथील घटना;चुडावा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
पूर्णा ता.३० मे(प्रतिनिधी)
सततच्या आजारपणामुळे मनावर परिणाम होऊन एका ३९ वर्षीय महीलेने आपल्या राहत्या घरी स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास लावून(Hanging Death) आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ता.३० मे रोजी पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव वाडी येथे घडली आहे.याप्रकरणी चुडावा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गंगासागर माधव हुलसुरे (वय ३९) वर्षे, रा.कावलगांव वाडी,ता. पुर्णा असं त्या गळफास लावून आत्महत्या केलेल्या महीलेचे नांव आहे.सदरील महीला ही मागील काही महिन्यांपासून आजारी होती.दरम्यान आजारपणामुळे तीच्या मनावर परिणाम झाला असल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे.गंगासागर हुलसुरे या गुरुवारी रात्री आपल्या घराच्या खोलीत झोपल्या होत्या.त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या खोलीत छताच्या लोखंडी हुकास गळफास लावून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.घटनेची खबर चुडावा पोलीसांना दिल्यानंतर पोलिसांनी मयत महीलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत, उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे.मयताचे नातेवाईक विश्वनाथ किशनराव हुलसुरे यांनी दिलेल्या खबरीवरुन चुडावा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकाॅ कच्छवे करत आहेत.