‘वंदेभारतला’ नांदेडहुन रवाना करण्याचा मुहूर्त ठरला
२६ आॅगस्ट रोजी उद्घाटन;२८ पासून नांदेड येथून धावणार वंदेभारत एक्सप्रेस
परभणी,ता.९(प्रतिनिधी) : रेल्वे बोर्डाने नांदेड पर्यंत विस्तार केलेल्या मुंबई-जालना(वंदेभारत एक्सप्रेस)ला नांदेड येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कडे रवाना करण्याचा मुहूर्त ठरवला असुन ता.२८ आॅगस्ट पासून नांदेड येथून चालवली जाणार आहे.२६ आॅगस्ट रोजी एक उद्घाटन विशेष गाडी देखील सोडण्यात येणार असल्याची माहिती नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या जालना ते मुंबई ‘वंदेभारत’ एक्सप्रेसचा प्रवास आता नांदेड रेल्वे स्थानकावरुन होणार आहे.केंद्रीय रेल्वे बोर्डाने १२ जुन रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले होते.परंतु सदरील गाडी कधीपासून चालवली जाणार हे मात्र नक्की कळविले नसल्याने संभ्रम कायम होता. २६ ऑगस्ट रोजी विस्तार केलेल्या ‘वंदेभारत’ गाडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही गाडी गुरुवार वगळता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून दादर, ठाणे,कल्याण, नाशिक,मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना,परभणी या मार्गाने ता.२७ आॅगस्ट पासुन दुपारी १;१० वाजता निघुन नांदेड रेल्वे स्थानकावर रात्री १०;५० वाजता पोहोचेल. तर बुधवार वगळता हुजुर साहेब नांदेड येथून ता.२८ रोजी सकाळी ५ वाजता परत याच मार्गाने मुंबई कडे रवाना होऊन दुपारी २:२५ वाजण्याच्या सुमारास पोहचणार आहे.सदरील गाडी ही २० डब्यांची असेल,९ तास २५ मिनीटात हे आपलं निर्धारित अंतर कापेल.रेल्वे प्रशासनाने अद्यापही गाडीचे वेळापत्रक जारी केलेले नाही.तसेच या गाडीचे आरक्षण बुकींग टिकीट खिडकी वरुन होणार की आँनलाईन पद्धतीने करावे लागणार हेही स्पष्ट करण्यात आले नाही.
——————————
वंदेभारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय झाला.जालना येथून परभणी, नांदेड असा प्रवास वाढवला आहे.मात्र १५० वर्षांपासून कार्यरत असलेल्या ऐतिहासिक पूर्णा जंक्शन स्थानकावर या गाडीला थांबा देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.या गाडीला थांबा दिल्यास पुर्णासह वसमत ,हिंगोली,वाशिम येथील प्रवाशांना लाभ मिळू शकेल.











