गुजरातच्या हातात महाराष्ट्राचं राजभवन.! आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
मुंबई, ता.११ (प्रतिनिधी):Acharya Devvrat has Governor of Maharashtra Newsभारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजभवनात बदल झाला आहे. राज्यपाल पद रिक्त झाल्याने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.राष्ट्रपती भवनाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, “सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावी होईल.”
कोण आहेत आचार्य देवव्रत..?
आचार्य देवव्रत हे २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी २०१५ ते २०१९ या कालावधीत ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये झाला. शिक्षण, सामाजिक कार्य आणि शाश्वत शेती या क्षेत्रांतील योगदानासाठी त्यांची ओळख आहे.
राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी निवड..
महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी.पी. राधाकृष्णन ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी ठरले. त्यांनी इंडिया ब्लॉकचे उमेदवार व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचा ४५२ विरुद्ध ३०० अशा मतांनी पराभव केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार म्हणून त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी प्रभावी विजय मिळवत देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च संसदीय पदावर आपली नोंद केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आणि आचार्य देवव्रत यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. पुढे महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कायमस्वरूपी नियुक्ती कोणाची होते, याकडे आता राज्य आणि देशाचे राजकीय लक्ष लागले आहे.












