पुर्णा,थुना नदीला पुर;कौडगांव शिवारातील नदीपात्रात ४ मजूर अडकले..
महसूल व पोलीस घटनास्थळी दाखल ६ तासांपासून बचावकार्य सुरू;आव्हई येथे २ पशुधन दगावले
पुर्णा ता.१३(प्रतिनिधी )4 laborers got stuck in Purna, Thuna river in Pur Kaudaon Shivara. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे पुर्णा तालुक्यातील थुना नदी व पुर्णा नदीचे पात्र उफाळून वाहत आहे. पूर्वेस थुना व पश्चिमेस पुर्णा अशा नद्यांच्या लाभक्षेत्रात नांदेड-जालना समृद्धी महामार्गाचे काम सुरु आहे. कामासाठी माॅन्टोकार्लो कंपनीच्या वतीने जेसीबी, क्रेन यांसारखी अवजड यंत्रसामग्री तैनात आहे. याच ठिकाणी काम करणारे विक्की सिंग लक्ष्मण सिंग, सलाउद्दीन सिद्दिकी, शिवकुमार आणि सदाकत अली हे चार मजूर शुक्रवारी (ता.१२) रात्रीपासून पावसाच्या पाण्यात अडकले असून जीव मुठीत घेऊन मशीनवर बसले आहेत.पुर्णा-थुना नद्यांचा प्रवाह धोक्याच्या पातळीवर गेला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसाठी ही घटना मोठी कसोटी ठरत आहे.तर पुर्णा तालुक्यातील आव्हई शिवारात ओढ्याला आलेल्या पुराने एका शेतकऱ्याच्या शेत आखाड्यात बांधलेले दोन पशुधन पाण्यात बुडून दगावल्याची माहिती आहे.

पुर्णा-कौडगांव शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे.तेथे पुराच्या पाण्यात ४ मजुर अडकले आहेत.दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अडकलेल्या मजुरांनी फोनवरून पूर्णा पोलिस ठाणे व जिल्हा पोलिस कंट्रोल रूम, परभणी यांना मदतीसाठी कळविले. “नदीचे पाणी सतत वाढत आहे. आम्ही मशीनवर चढून बसलो आहोत. सध्या सुरक्षित आहोत, पण कधीही धोका वाढू शकतो. आम्हाला तातडीने सोडवा,” असे त्यांनी सांगितल्याचे पोलिस सूत्रांनी माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथिकर यांना कळवून तातडीने नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मंडळ अधिकारी खुणे, तलाठी कटके-गलांडे, कोतवाल शिवप्रसाद देवणे-नंदकुमार शेलाटे, कोतवाल कळसाईतकर, जमादार श्याम काळे, पोहेका टाकरस यांना सोबत घेऊन परभणी आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी रवाना झाले.तथापि, वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे परभणी आपत्ती व्यवस्थापन पथकाला बचाव कार्य करण्यात अपयश आले. त्यामुळे आता पुर्णा नगरपालिकेच्या बचाव पथकास बोटीसह घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या या मोहिमेत मागील सहा तासांपासून अथक प्रयत्न सुरू असून, नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.दरम्यान, मजुरांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या चार कामगारांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाच्या धावपळीने स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आव्हई शिवारात ओढ्याला आलेल्या पुरात २ पशुधन दगावले.

आव्हई शिवारातुन वाहनारा गावालगतच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शुक्रवारी ता.१२ रोजी मध्यरात्री परिसरात देवीदास साहेबराव पवार यांचा शेत आखाड्यात बांधलेल्या दोन म्हैस पुराच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे.शेतक-याचे अंदाचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.प्रशासनाला स्थानिक पोलीस पाटील संदिप सोनवणे यांनी कळवले मात्र घटनास्थळी संबंधित प्रशासनाचे कोणीही दाखल नसल्याचे समजते.











