Parbhani जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’जाहीर करावा:खासदार संजय जाधव यांची मागणी

Spread the love

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज

परभणी,ता.१५ (प्रतिनिधी) :
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांची पिके, जनावरे आणि उपजीविका उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा ‘ओला दुष्काळ’ म्हणून घोषित करावा, अशी ठाम मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते परभणीचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांनी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली.
परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची खा.जाधव व शिष्टमंडळाने (ता.१६) रोजी भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात सद्याच्या खरिप हंगामात सलग झालेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिके पाण्याखाली गेली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे जनावरे दगावली असून पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी जनावरांसाठी चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच कर्जफेडीचा डोंगर शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.या स्थितीत केवळ शासकीय निकषांवर थांबून न राहता शेतकऱ्यांना व्यापक स्वरूपात मदत करणे आवश्यक असल्याचे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.
पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासकीय मदत,नुकसान भरपाई, कर्जमाफी तसेच ‘ओला दुष्काळ’ घोषित झालेल्या भागातील विशेष अनुदान त्वरित देण्याची मागणी त्यांनी केली.खासदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर गंगाप्रसाद आणेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, सोपानराव मोरे, वसंतराव देशमुख, सुभाष आहेर, बापुराव तावडे यांसह इतर मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर आलेले संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना शासनाने तात्काळ निर्णय घेऊन ‘ओला दुष्काळ’ घोषित करून मदतीचे दरवाजे उघडावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

You cannot copy content of this page