पूर्णा स्थानक घाणीने गुदमरतेय.!स्वच्छतेची कामे रखडली

Spread the love

प्रवेशद्वारावर घाण वासाने स्वागत;स्थानक बनले भिका-यांचे आश्रयस्थान; वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज.

पूर्णा ता.१८(प्रतिनिधी): पूर्णा रेल्वे स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात; मात्र प्रवेशद्वारावर पसरलेली कचऱ्याची ढिगारे, दुर्गंधी, डास-माशांचा उपद्रव आणि उघड्यावर लघुशंकेचे प्रकार यामुळे प्रवाशांना नाक दाबून यावे लागत आहे. या दुर्दशेमुळे पूर्णा शहराची प्रतिमा मलीन होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, अन्नाचे अवशेष, थुंकी आणि गटारीतून ओसरणारे गलिच्छ पाणी यामुळे परिसर अस्वच्छतेचा अड्डा झाला आहे. रेल्वे प्रशासन व स्वच्छता विभाग केवळ नावापुरते उपस्थित राहून जबाबदाऱ्या झटकताना दिसत आहेत.

वारंवार सांगून देखील कोणतीही ठोस कारवाई होत नसून अस्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत असून आणि प्रवासी वर्गातून तीव्र रोष व्यक्त होत आहे. “स्वच्छ भारत मोहिमेचा गाजावाजा केला जातो, मात्र पूर्णा स्थानकाच्या प्रवेशद्वारासह परिसरात प्रचंड घाण दिसते; अधिकारी इतके आंधळे-बधिर झाले आहेत का?” असा सवाल प्रवासी करीत आहेत.याठिकाणी स्वच्छतेचे काम खाजगी कंत्राटदाराकडे दिले असले तरी थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानक हे कोणत्याही शहराचे प्रतिनिधिक प्रवेशद्वार मानले जाते. अशा स्थितीत पूर्णा स्थानकाची दुर्दशा शहराच्या प्रतिष्ठेवर डाग लावत असून, नांदेड विभागीय व्यवस्थापकांनी तात्काळ लक्ष घालून कंत्राटदाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांसह नागरिकांतून केली जात आहे.

You cannot copy content of this page