श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात २३५ विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात रोजगार निवडावा – सहाय्यक आयुक्त बालाजी मरे
पूर्णा ता.१९(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी आणि श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय, पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महाविद्यालयात पार पडला.
पुर्णा येथील श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात (ता.१९) रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, नांदेड आणि परभणी येथील विविध क्षेत्रातील दहा कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मेळाव्यात तब्बल ३०० रोजगाराच्या जागा उपलब्ध होत्या. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर परिसरातील २३५ विद्यार्थ्यांनी मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.या प्रसंगी संस्थेचे अमृतराज कदम, उत्तमराव कदम, प्रा.गोविंदराव कदम, बालाजी मरे, कौशल्य विकास अधिकारी म.श. शिंदे, प्राचार्य डॉ. के.राजकुमार,उपप्राचार्य डॉ.शिवसांब कापसे, डॉ.गजानन कुरुंदकर, डॉ. संजय दळवी, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी, अधीक्षक बालासाहेब कुलकर्णी, डॉ. जितेंद्र पुल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी सांगितले की, महाविद्यालयात आतापर्यंत पाच रोजगार मेळावे यशस्वीरीत्या पार पडले असून ७० हून अधिक विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी मिळाली आहे. त्याच धर्तीवर सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे प्राचार्य राजकुमार म्हणाले.
प्रमुख मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त बालाजी मरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात रोजगाराची निवड करून भविष्यात मोठ्या पदापर्यंत मजल मारावी. कोणताही रोजगार छोटा किंवा मोठा नसतो. सुरुवातीला कमी पगार असला तरी संधीचा फायदा घेऊन अनुभव मिळवणे हे महत्त्वाचे आहे.”
अध्यक्षीय समारोप करताना मा.अमृतराज कदम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, महाविद्यालयीन स्तरावर उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. संस्थेचे सातत्याने प्रयत्न हेच विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात मोलाचे ठरत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरीश डावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. जितेंद्र पुल्ले यांनी मानले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्र परभणीची टीम यांच्या सहकार्याने रोजगार मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला











