थुना नदी धोक्याच्या पातळीवर;श्री सजगीर महाराज देवस्थान पाण्याखाली;झिरोफाटा,कात्नेश्वर रस्ता बंद

Spread the love

माटेगाव व आहेरवाडी शिवारातील शेती पाण्याखाली, वाहतूक ठप्प

पुर्णा ता.२२ (प्रतिनिधी)– शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम पुर्णा तालुक्यातही दिसून आला आहे. थुना नदीने रविवारी (दि.२१) मध्यरात्रीपासून धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे अनेक भागात रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत.

माटेगाव शिवारातून जाणाऱ्या पुर्णा–झिरोफाटा मार्गावरील बाह्यवळण रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू असताना तो परिसर जलमय झाला. परिणामी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच मौजे आहेरवाडी शिवारातील श्री सजगीर महाराज देवस्थान परिसर पाण्याखाली गेला असून आहेरवाडी–कात्नेश्वर रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे.थुना नदीच्या पाण्याने माटेगाव व आहेरवाडी शिवारातील जुन्या नदीकाठच्या शेकडो एकर शेती जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

सोमवारी (दि.२२) सकाळपासून या रस्त्यांवर वाहने अडकून पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. पुलावरून पाणी वाहत असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी “नागरिकांनी पायी अथवा वाहनाने धोकादायक प्रवास करू नये” असे आवाहन केले आहे.स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ झाल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवावे लागेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

You cannot copy content of this page