पुर्णेचे पाणी पिंपळगाव तर गोदावरीचे पाणी सोन्ना शिवारात
बीड,परभणी,जालना,हिंगोली जिल्ह्यातील प्रचंड पाऊस; बहुतांश धरणाचे दरवाजे उघडले;पुर्णा तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी/पूर्णा ता.२३(प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून बीड, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी मंगळवारी (ता.२३)रोजी पुर्णा व गोदावरी नद्यांना तालुक्यात मोठा पूर आला आहे.पुर्णा नदीचे पाणी पिंपळगाव शिवारात तर गोदावरी नदीचे पाणी सोन्ना शिवारात घुसले आहे. या अचानक आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूराचा सर्वाधिक परिणाम खालील गावांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे – पिंपळगाव, संदलापुर, कात्नेश्वर, कौडगाव, माटेगांव, खुजडा, कोल्हेवाडी, कानडखेड, निळा, अजदापुर, धनगर टाकळी, सातेगांव सारंगी, पिंपळगाव लिखा, सोन्ना, धानोरा मोत्या, सातेफळ, पेनुर कंठेश्वर आणि मिठापुर.या गावांच्या शिवारात पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता असून शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून जनजीवनावरही परिणाम होऊ लागला आहे.

सोन्ना शिवारात गोदावरी नदीचे पाणी परिसरातील शेतात घुसले आहे
दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणांतून आणखी पाण्याचा विसर्ग वाढल्यास पूरस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा हवामान विभाग व प्रशासनाने दिला आहे. नदीकाठच्या सर्व गावांनी सजग राहून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.











