राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना माणुसकीची दृष्टी मिळते-डॉ.प्रभाकर किर्तनकार

Spread the love

पुर्णा येथिल स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयांत रा.से.यो.चा स्थापना दिवस साजरा

पूर्णा (जंक्शन, ता. २४)राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमधून होणाऱ्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांना माणसातली माणुसकी शोधण्याची दृष्टी लाभते. महाविद्यालयीन जीवनात या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन तत्वज्ञान अभ्यासक डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले.

स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त उदबोधन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉ. किर्तनकार प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी, स्वयंशिस्त तसेच श्रमसंस्कार घडवते. मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढणारी अधोगती थांबवायची असेल, तर ग्रंथवाचनाचे व्यसन लावले पाहिजे. वाचनामुळे संयम, शांतता व समाजशीलता जोपासली जाते. विद्यार्थी आपला महाविद्यालयीन काळ ग्रंथालयात व्यतीत करतील तरच त्यांचे भविष्य सक्षम होईल.”


आरोग्य तपासणी शिबिर

यावेळी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पूर्णा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णू कानडकर व त्यांच्या टीमने जवळपास १०३ जणांची तपासणी केली. यात २८ कर्मचारी व ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते. बीपी, सीबीसी चाचण्या व सामान्य तपासण्या घेण्यात आल्या.डॉ. कानडकर यांनी या प्रसंगी युवकांना आरोग्य संवर्धन व निर्व्यसनी जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.


प्राचार्यांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थापक सचिव डॉ. रामेश्वर पवार यांनी “जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे व परिश्रमाची कास धरणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे,” असे सांगत जपानमधील जीवनसंस्कृती व स्वयंशिस्तीची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले.


अन्य मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत प्रा. डॉ. संजय कसाब यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले.
विचारमंचावर डॉ. भीमराव मानकरे, डॉ. भारत चापके उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. संतोष कुर्‍हे यांनी मानले.


कार्यक्रम यशस्वी

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. संजय कसाब, डॉ. भारत चापके, स्वयंसेवक, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


You cannot copy content of this page