Parbhani;येलदरी व दुधना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग;लष्करी तुकडी प्राचारण; जिल्ह्यात हायअलर्ट..!
परभणी, दि. २७ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील येलदरी व निम्न दुधना धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून शनिवारी (ता.२७) रोजी दुपारपासून दोन्ही धरणांतून सुमारे २२ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
🔹 येलदरी धरणातून विसर्ग
शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून येलदरी धरणाचे १, ५, ६ व १० क्रमांकाचे एकूण **४ दरवाजे ०.५ मीटरने उचलून** पूर्णा नदीपात्रात तब्बल **८,४३९.८८ क्युसेक** पाणी सोडण्यात आले. यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे.
🔹 दुधना धरणातून विसर्ग
सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाचे एकूण १० दरवाजे उघडण्यात आले असून **१३,४०० क्युसेक** पाणी दुधना नदीपात्रात सोडले जात आहे. त्यापैकी काही गेट्सद्वारे **५,३६० क्युसेक**, तर उर्वरित गेट्सद्वारे **८,०४० क्युसेक** इतका विसर्ग करण्यात आला आहे.धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरू असल्याने आवश्यकतेनुसार विसर्ग कमी-जास्त केला जाणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात अजिबात प्रवेश करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
🔹 जिल्ह्यात पूरस्थिती – प्रशासन सतर्क
येलदरी, दुधना यांसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख व मध्यम प्रकल्प तुडुंब भरल्याने **गोदावरी, पूर्णा, दुधना नद्या व उपनद्या** ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्याला **यलो अलर्ट** जाहीर करण्यात आला असून, नागरिकांनी नदीकाठ, धोकादायक रस्ते व पर्यटनस्थळे टाळावीत, असे जिल्हाधिकारी **संजयसिंह चव्हाण** यांनी आवाहन केले आहे.
🔹 लष्करी मदत तुकडी रवाना
संभाव्य पूरस्थितीचा विचार करून छत्रपती संभाजीनगर येथून **भारतीय सेनादलाची तुकडी** परभणीकरिता रवाना झाली असून मेजर कमाल यांच्या नेतृत्वाखाली ती लवकरच जिल्ह्यात दाखल होणार आहे.
🔹 अफवांवर विश्वास ठेवू नका – कठोर कारवाईचा इशारा
काही समाजकंटकांकडून पूरस्थितीबाबत खोटी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
🔹 आपत्कालीन संपर्क क्रमांक
* जिल्हा नियंत्रण कक्ष : **०२४५२-२२६४००**
* टोल फ्री : **१०७७**
* आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : **९९७५०१३७२६ / ७०२०८२५६६८**. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












