दुचाकीच्या जोरदार धडकेत महिला ठार,३ जणी गंभीर; दुचाकी स्वाराचाही मृत्यू
परभणी/ताडकळस ता.८(प्रतिनिधी) – परभणी तालुक्यातील ताडकळस येथील सिंगणापूर रोडवरील गॅस एजन्सीजवळ मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याच अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगणापूर रस्त्यावरील गॅस एजन्सीजवळ एम.एच.२२ बी.जी.१४३९ क्रमांकाच्या दुचाकीवरून येणाऱ्या गौतम लिंबाजी मस्के (वय ४१, रा. पांढरी, ता. जि. परभणी) यांनी शेतातील सोयाबीन कापणीचे काम करून पायी घरी परतणाऱ्या शेतमजूर महिलांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शेख मुमताज शेख अजमोद्दीन, शेख शमिना बी शेख नूर, शेख शमिना शेख हमीद या महिला गंभीर जखमी झाल्या. तर शेख शमिना बी शेख नूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. इतर तीन महिलांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. दुचाकीस्वार गौतम मस्के यांना सुरुवातीला परभणी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शेख मुक्रम शेख शरफोद्दीन यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक गजानन काठेवाडे व बिट जमादार नामदेव सुजलोड हे करीत आहेत.या अपघातामुळे ताडकळस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून ग्रामीण भागात रस्त्यावरील बेफाम वेग आणि निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.












