ग्रामसेवकांविरोधात पंचायत समिती समोर प्रहारच ‘रेडा भेट आंदोलन’
आंदोलनाच्या धसकान्ये ग्रामसेवक फिरकलेच नाहीत;दहा दिवसांत निधी वाटप न झाल्यास रेडा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेट देणार
पूर्णा ता.१३ (प्रतिनिधी) :
पूर्णा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी वितरित न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१३) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर “ग्रामसेवकास रेडा भेट देण्यासाठी आंदोलन” करण्यात आले. मात्र आंदोलनाच्या धसकान्ये तालुक्यातील एकही ग्रामसेवक हजर नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पंचायत समितीस मार्फत निधी वाटपासाठी दहा दिवसांचा अल्टीमेट देत हा रेडा थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट देणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुर्णा तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी वितरीत करण्यात आला नसल्याने येथील पंचायत समिती समोर ग्रामसेवकांविरोधात सोमवारी आंदोलन केले.यावेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष शिवहार सोनटक्के,नरेश जोगदंड,माणीक सुर्यवंशी आदींसह श्याम सोनुले, बालाजी पौळ, श्रीहरी इंगोले, राम सुके, चंपत कदम, विष्णु चेव्हाण, ज्ञानेश्वर बुचाले यांसह प्रहार सेवक आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांनी दिव्यांग बांधवांचे निवेदन स्वीकारले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या दारावर बीडीओंना धरून निषेध व्यक्त केला. आंदोलनाच्या वेळी कोणताही ग्रामसेवक उपस्थित राहिला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी याचा निषेध नोंदवित कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
प्रहार जनशक्ती पक्षाने चेतावणी देत , दहा दिवसांत संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्यास परभणी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना “रेडा भेट आंदोलन” करून पुढील तीव्र लढा उभारला जाईल.असे प्रहारचे तालुका अध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी सांगितले.












