धनत्रयोदशीला पुर्णेत रंगला पालखी व रिंगण सोहळा
महादेव मंदिर संस्थानच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता;माहेरवाशीणींचा सहभाग

पूर्णा, ता.१८(प्रतिनिधी):धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पुर्णेचे ग्रामदैवत श्री महादेव मंदिर संस्थान येथे आज हरिनामाचा गजर आणि भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळाला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ज्ञानयज्ञ पारायण सोहळ्याची सांगता शनिवारी (दि.१८) सकाळी पारंपरिक पालखी आणि रिंगण सोहळ्याने थाटात झाली.यावेळी सोहळ्यास माहेरवाशिणींची उपस्थिती लक्षणीय होती.

पुर्णा शहरातील ग्राम दैवत महादेव मंदिर संस्थान येथे येथे (ता.११ ऑक्टोबर) पासून मोठ्या भक्तिभावात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भागवत, किर्तन आदी कार्यक्रमांनी पुर्णा शहर हरिनाममय झाले होते. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त शनिवारी सकाळी ८ वाजता श्री महादेव मंदिर संस्थान येथून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. वाजतगाजत, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “राम कृष्ण हरी”च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मार्गक्रमण करत जुनामोंढा बाजार मैदानावर पोहोचली.
यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या वेळी दिपावलीनिमित्त माहेरहून आलेल्या असंख्य लेकी-बाळी, सुवासिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन पालखीमध्ये सहभागी होत या सोहळ्याला विशेष शोभा आणली. तर लहान मुले, युवक आणि वृद्धांचा उत्साहही लक्षणीय होता. महिला वर्गाने टाळ-मृदंगाच्या गजरात फुगड्या, पाऊली खेळत भक्तीरसात रंगून गेल्या. सकाळी ११ वाजता ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या उपस्थितीत काल्याचा सोहळा पार पडला. प्रवचनात बोलताना त्यांनी सांगितले की, “पवित्र आणि चारित्र्यसंपन्न जीवन हेच खऱ्या अर्थाने माणसाचे खरे वैभव आहे. चारित्र्य संपन्नता माणसाला अजरामर करते, तर चारित्र्यहीनता जीवन संपवते.”
सप्ताहाच्या सांगतेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी लाभ घेतला. या सोहळ्यात पुर्णेतील सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.












