पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात बेफिकिरी; पत्रकार फटाक्याने जखमी!

Spread the love

पुर्णा शहरातील घटना;कार्यक्रमातील प्रशासन व आयोजकांचा बेफिकीर कारभार

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी);परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पूर्णा शहरात झालेल्या भाजपा संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात स्वागतासाठी फटाके फोडण्यात आले. मात्र, या उत्साहात सुरक्षिततेचा पूर्ण विसर पडल्याने पत्रकार श्रीहरी घुले गंभीर जखमी झाले.

शनिवारी (दि. २५) दुपारी सुमारास आनंदनगर चौकात हा प्रकार घडला. पालकमंत्री येताच कार्यकर्त्यांनी आंधळेपणाने फटाके फोडण्यास सुरुवात केली. यातील एक फटाका उडून थेट वृत्तांकनासाठी आलेल्या घुले यांच्या डोक्यात आदळला. क्षणात डोक्यातून रक्त वाहू लागले, तरीही कार्यक्रमस्थळी कोणत्याही जबाबदार व्यक्तीने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, ही खेदजनक बाब आहे.रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने जखमी पत्रकाराला रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अखेर स्थानिक नागरिकांनी पुढे येत प्राथमिक उपचार करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला २ ते ३ इंच खोल जखम झाल्याचे सांगितले.या घटनेतून सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन, तसेच प्रशासन आणि आयोजकांची निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. एका जबाबदार कार्यक्रमात पत्रकार जखमी होणे ही गंभीर बाब असून, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार वर्तुळातून होत आहे.

You cannot copy content of this page