विहिरींच्या कुशल बिलांसाठी स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन
पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथिल गोदापात्रात शेतकऱ्यांच्या सहभाग
पूर्णा, ता. 30 (प्रतिनिधी):
रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विहिरी, गायगोठे आदी कामे पूर्ण करूनही चार वर्षांपासून कुशल बिलांचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 2021 पासून प्रलंबित असलेल्या या बिलांच्या मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) येथे गुरुवारी (दि. 30) गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. परिस्थितीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण आणि पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मिसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांनी 2021 पासून प्रलंबित विहिरींची कुशल बिले महिनाभरात काढून शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचे आश्वासन दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी पोलिस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, जिल्हाध्यक्ष रामप्रसाद गमे, परभणी तालुकाध्यक्ष मुंजा लोडे, पूर्णा तालुकाध्यक्ष पंडितअण्णा भोसले, तसेच माऊली शिंदे, नागेश दुधाटे, आदिनाथ लवंदे, अॅड. राम गोळेगावकर, भगवान दुधाटे, विष्णु दुधाटे, बळीराम दुधाटे, मोतीराम दुधाटे, एकनाथ जोगदंड, प्रल्हाद दुधाटे, माधवराव दुधाटे, अनिल दुधाटे, नवनाथ दुधाटे, शंकर दुधाटे, बळी दुधाटे, उपसरपंच दिगंबर दुधाटे, पोलिस पाटील शिवाजी दुधाटे आदी उपस्थित होते.संघटनेने प्रशासनाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.












