Parbhani;चाकू हल्ल्यात पालीकेचा अग्निशमन विभागाचा जवान जखमी
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथिल घटना; पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल
पाथरी ता,१०(प्रतिनिधी)
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवार, (ता.९)फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली.असून त्यांच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार जखमींवर उपचार सुरू आहेत.
खुरमखान खदीरखान पठाण (रा. अग्निशामक क्वार्टर्स, एकतानगर, पाथरी) असं त्या जखमी कर्मचाऱ्यांचे नांव आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शारेफखान रफिकखान पठाण हे गेल्या दहा वर्षांपासून पाथरी नगरपरिषद अंतर्गत अग्निशामक विभागात फायरमन म्हणून कार्यरत आहेत. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या कामासाठी त्यांची व सहकारी खुरमखान पठाण यांची शहरातील आयटीआय महाविद्यालयात सायंकाळी चार वाजेपर्यंत ड्युटी होती.
कर्तव्य संपल्यानंतर दोघेही शासकीय कामानिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची भेट घेण्यासाठी रशिद कॉलनी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले. मात्र, त्या ठिकाणी वॉचमनने “साहेबांकडे पाहुणे आले आहेत, थोडावेळ थांबा,” असे सांगितल्याने दोघेही निवासस्थानाच्या परिसरात थांबले होते.
दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हबीबखान हमीदखान पठाण हा मोटारसायकलवर तेथे आला आणि थेट निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी खुरमखान पठाण यांनी पाहुणे असल्याचे सांगून त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपी हबीबखान पठाण याने जीवे मारण्याची धमकी देत कमरेतील चाकू काढून खुरमखान पठाण यांच्या पोटात वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी खुरमखान पठाण यांना तातडीने पाथरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर ग्रामीण रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी शारेफखान रफिकखान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यात आरोपी हबीबखान हमीदखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहेत.











