Mahashivratri Hingoli;औंढा नागनाथात मंदिरात भाविकांची मांदियाळी

Spread the love

आ. संतोष बांगर यांच्याकडून नागनाथाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न

औंढा नागनाथ,ता.१५(प्रतिनिधी):
Mahashivratri Hingoli Aundha Nagnath Temple महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री नागनाथ मंदिर येथे रविवारी (दि. १५) पहाटेपासूनच भक्तांची अभूतपूर्व गर्दी उसळली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून टाकला.

याआधी शनिवारी (दि. १४) मध्यरात्री मंदिर सल्लागार समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा आमदार संतोष बांगर यांनी पत्नी सौ. गोदावरीताई बांगर यांच्यासह नागनाथाची शासकीय महापूजा विधीवत पार पाडली. धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात महापूजा संपन्न झाली.

त्यानंतर रविवारी पहाटे सुमारे दीड वाजता मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्याक्षणापासूनच भाविकांच्या रांगा वाढू लागल्या. सकाळी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीही सपत्नीक दर्शन घेतले. मंदिर परिसरात जयघोष आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. तीन वरिष्ठ अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, एपीआय-पीएसआय, १०८ अंमलदार, ८० होमगार्ड, एसआरपीच्या दोन तुकड्या तसेच क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय ३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. पोलीस निरीक्षक जी. एस. राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत गस्त सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनीही ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवले.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. मंदिर समितीचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ आणि गार्ड प्रमुख बबन सोनूणे यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली. दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विविध ठिकाणी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती.दिवसभर अखंडपणे दर्शनाची रांग कायम होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा नागनाथ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

You cannot copy content of this page