जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत

Spread the love

जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीच्या चौकशीसाठी समिती गठीत
▪️दोषींवर गुन्हे दाखल करु -जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर  
 
परभणी (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यातील कोरोना निवारणाचे संकट यशस्वी पेलवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात वेगळे मापदंड निर्माण करुन परभणी जिल्ह्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने एकसंघ होऊन आजवर कार्य केले आहे. तथापि जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीची घटना ही क्लेशकारक असून वारंवार अशा घटना का होतात याची समूळ चौकशी करुन दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करु असे जिल्हाधिकारी दि. म. मुगळीकर यांनी स्पष्ट केले.
 
काल दि. 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा. अपघात विभागातील दुसऱ्या मजल्यावरील जिन्यावर ठेवण्यात आलेल्या लाकडी सामानास आचानक आग लागली होती. हे लाकडी सामान वापरात नसलेले होते. याचबरोबर आज दि. 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालयातील लाँड्री विभागात आगीची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे.
 
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या घटनेमुळे कोणत्याही प्रकारची मनात भिती बाळगण्याचे कारण नाही. जिल्हा रुग्णालयातील सर्व विभाग अधिक दक्ष झाले असून रुग्णांवर वेळीच उपचारांसाठी प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी स्पष्ट केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन्ही घटनांच्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. रुग्णालय परिसरातील विनावापराचे व इतर जे काही गार्बेज आहे त्याची व्यवस्थीत विल्हेवाट लावण्यासह ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या-त्या ठिकाणी सुरक्षिततेच्यादृष्टिने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या.
 
या आगीच्या चौकशी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंटेकर यांच्या अध्यक्षतेखाली असेल. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. के. डाके, मनपा उपायुक्त गायकवाड आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सूरवसे यांचा समावेश आहे.
 
याचबरोबर फायर ऑडिटच्यादृष्टिनेही स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपा आग्निशामक दल विभाग प्रमुख आणि उपविभागीय दंडाधिकारी यांचा समावेश आहे. या समितीला देखील आपला अहवाल संपूर्ण चौकशी करुन लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले.   
0000

You cannot copy content of this page