स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झिरोफाट्यावर पकडला ५ किलो गांजा

Spread the love

पुर्णा पोलीसांच्या नाकाबंदी दरम्यान उघडकीस आली घटना;तिघांविरुद्ध गुन्हा;

पूर्णा, ता.२८ (प्रतिनिधी):

झिरो फाटा परिसरात पुर्णा पोलिसांनी उभारलेल्या नाकाबंदी दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.२७) रोजी रात्री संशयितांकडून तब्बल ५ किलो ११० ग्रॅम गांजा जप्त केला असून या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी झिरो फाटा परिसरातुन गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास मिळाली.त्यानुसारटोल नाक्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी लाऊन वाहनांची तपासणी सुरू केलीत्यावेळी वसमतच्या दिशेकडून येणारी भरधाव ( एम.एच ३८ एई ६२६८ )क्रमांकाची पल्सर मोटारसायकल संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता चालकाने आपले नाव आदीनाथ नागोराव चव्हाण तर सोबत्याने हानीफ नुरमिया शेख असे सांगितले.

बॅगेची तपासणी करण्याबाबत विचारणा होताच दोघांनीही घाईगडबडीत बॅग घटनास्थळी फेकून दिली आणि मागून आलेल्या विनानंबर स्प्लेंडर मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तीसोबत पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला; मात्र तिघेही शेताच्या दिशेने धावत पसार होण्यात यशस्वी ठरले.घटनास्थळी सोडून दिलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच पल्सर मोटारसायकल व एक बॅग असा एकूण १ लाख ८ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अंदाजे २८ हजार ७७० रुपये किमतीचा ५ किलो ११० ग्रॅम गांजा आणि सुमारे ८० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल समाविष्ट आहे.या कारवाईची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पो.नि. विवेकानंद पाटील व पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि जगताप, पोउपनि चंदनसिंह परिहार, पोउपनि श्रीनिवास पडलवार, रवीकुमार जाधव, रंगनाथ दुधाटे, केशवराज लटपटे, सचिन भदरगे, रंजित आगळे, गजानन क्षीरसागर, निलेश परसोडे, दिपक मुदीराज, साने आदींच्या पथकाने ही संयुक्त कारवाई पार पाडली.

सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांच्या फिर्यादीवरून आदीनाथ नागोराव चव्हाण, हानीफ नुरमिया शेख आणि स्प्लेंडर मोटारसायकलवरील अनोळखी चालकाविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोबाडे करीत आहेत.

You cannot copy content of this page