रेल्वेची अनधिकृत फेरीवाल्या विरोधात धडक कारवाई
-५६ अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही
परभणी/प्रतिनिधी
रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेगाडी व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध सात दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम २० ते २६ फेब्रवारी दरम्यान राबविण्यात आली.
रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ व नियमबद्ध सेवा उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत विक्रेत्यांच्या समस्येला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. मोहिमेदरम्यान नांदेड विभागांतर्गत विविध स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांत व्यापक तपासण्या करण्यात आल्या. वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाड्यांमध्ये तसेच स्थानकांवर सखोल तपासणी करून अनधिकृत विक्रेत्यांची ओळख पटविली. तसेच अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून नियमांचे पालन होत आहे का ? याची खात्री केली. अधिकृत विक्रेत्यांनी वैध परवाना व ओळखपत्र दर्शविणे तसेच रेल्वेने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे यावर विशेष भर देण्यात आला. सततच्या अंमलबजावणीमुळे या मोहिमेत एकूण ५६ अनधिकृत विक्रीची प्रकरणे आढळून आली असून संबंधितांविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
काही प्रकरणी अनधिकृत विक्रेत्यांना पुढील कारवाईसाठी आरपीएफकडे सोपविण्यात आले. या मोहिमेदरम्यान एकूण २३ हजार १६५ रूपये इतका दंड वसूल करण्यात आला असून रेल्वे परिसरात शिस्त व सुव्यवस्था राखण्याच्या विभागाच्या बांधिलकीचे हे द्योतक आहे. अनधिकृत विक्री ही केवळ नियमनबद्ध केटरिंग व्यवस्थेवर परिणाम करत नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेशी, अन्नपदार्थांच्या स्वच्छतेशी आणि गाड्या व स्थानकांतील सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करते. या मोहिमेमुळे प्रवाशांच्या हितसंरक्षणासाठी विभागाची सक्रिय भूमिका अधोरेखित होते.
प्रवाशांनी केवळ वैध परवाना व ओळखपत्र दर्शविणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी कराव्यात. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना प्रोत्साहन देऊ नये व अशा कोणत्याही प्रकारची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा रेल्वे हेल्पलाईन १३९ वर कळवावी. प्रवाशांना सुरक्षित, संरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी अशा विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, असे माहिती रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
______










