परभणीत मंगळवारी खंडग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन

Spread the love

परभणी,ता२/प्रतिनिधी :
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही आकाशीय वस्तू एकाच सरळ रेषेत आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्या प्रक्रियेला चंद्रग्रहण म्हणतात. पृथ्वीच्या गडद सावलीत संपूर्ण चंद्र झाकला गेला तर त्याला खग्रास चंद्रग्रहण, काही भाग झाकला गेला तर खंडग्रास, तर फक्त उपछायेचा स्पर्श झाला तर छायाकल्प चंद्रग्रहण असे संबोधले जाते.

मंगळवार, दि. ३ रोजी होणारे ग्रहण हे खंडग्रास प्रकारातील असणार आहे. परभणीत सायंकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी चंद्रोदय होणार असून, त्या वेळी ग्रहण सुरूच असेल. त्यामुळे ६:२८ ते ६:४७ या कालावधीत अवघ्या १९ मिनिटांसाठी खंडग्रास अवस्थेतील चंद्राचे प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घेता येणार आहे.या ग्रहणाची सुरुवात दुपारी ३:१९ वाजता होईल आणि सायंकाळी ६:४७ वाजता खंडग्रास अवस्था समाप्त होईल. त्यानंतर छायाकल्प अवस्था रात्री ७:५३ पर्यंत राहणार आहे. परभणी येथून सुमारे २० टक्के ग्रहण दृश्यमान होणार आहे. विशेष म्हणजे ग्रहण सुरू असतानाच पूर्व क्षितिजावर चंद्र उगवणार असल्याने या प्रकाराला ‘ग्रस्तोदित’ चंद्रग्रहण असे म्हटले जाते.

हे खगोलीय दृश्य उघड्या डोळ्यांनी सुरक्षितरीत्या पाहता येते. पूर्व दिशेला मोकळे क्षितिज असलेल्या जागेतून किंवा घराच्या सुरक्षित छतावरून साध्या डोळ्यांनी, दुर्बिणीने किंवा बायनोकुलरच्या साहाय्याने हे दृश्य अनुभवता येईल.ग्रहण ही केवळ नैसर्गिक खगोलीय प्रक्रिया असून त्यामागे कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये. नागरिक, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या घटनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा, असे आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page