“माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत एक दिवस शाश्वत जीवनशैलीसाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सायकलवर कार्यालयात येऊन दिला कृतिशील संदेश
“माझी वसुंधरा” उपक्रमांतर्गत एक दिवस शाश्वत जीवनशैलीसाठी
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सायकलवर कार्यालयात येऊन दिला कृतिशील संदेश
परभणी 9 :- अत्याधुनिक जीवनशैली, नैसर्गीक संसाधनांचा गरज नसतांना अतीवापर यामुळे पर्यावरणाचा असमतोल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ऊर्जेसाठी लागणारी जे काही गौण खनिजे आहेत त्याचे साठे अत्यंत मर्यादीत असल्याने भविष्यातील परिस्थितीचा विचार करता शाश्वत जीवनशैलीला अंगिकारणातच संपूर्ण मानव जातीचे हित आहे. आठवड्यातील किमान एक दिवस तरी शाश्वत जीवनशैलीचा नागरिकांनी अंगिकार केला तर या वसुंधरेच्या संतुलनाला अप्रत्यक्ष मोठा हातभार लागू शकेल यादृष्टिने “माझी वसुंधरा” अभियानांतर्गत आठवड्यातील मंगळवारी अभिनव उपक्रम घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आठवड्यातील दर मंगळवारी सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयाला जाण्या-येण्यासाठी सायकल, पायी चालणे अथवा ज्यांचे अंतर खूप दूर आहे ते सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करणार आहेत. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी केला.
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यायेण्यासाठी सायकलवर येणे पसंत केले. त्यांच्यासमवेत मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर सायकल चालवीत आले.
जिल्ह्यातील सर्व शासकिय यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी या अभिनव उपक्रमाचे पालन करणार आहेत.
000000












