पालीकेच्या उदासीन धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांत असंतोष..!

Spread the love

पावसाळ्यात उघड्यावर संसार; रमाई व पंतप्रधान घरकुल योजनेचा निधीचे वाटप करण्याची मागणी शेकडो लाभार्थी अडचणीत;आंदोलनाचा इशारा

पूर्णा, ता. ८ (प्रतिनिधी) :

गरीबांना हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास व पंतप्रधान घरकुल योजनांचा पूर्णा शहरात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पात्र ठरलेल्या अनेक लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून जुनी घरे पाडली, नवीन घरांचे बांधकाम सुरू केले; मात्र मागील अनेक महिन्यां पासून निधीच वितरित न झाल्याने शेकडो कुटुंबांचा संसार ऐन पावसाळ्यात उघड्यावर आला आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून लाभार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

      घरकुलासाठी पात्र ठरलेल्या अनेक कुटुंबांनी स्वतःचे जुने घर पाडल्यानंतर निधी वेळेत मिळेल, या अपेक्षेने बांधकाम सुरू केले. मात्र निधीचे हप्ते रखडल्याने अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. परिणामी काही कुटुंबे भाड्याच्या घरात राहत आहेत, तर काहींना नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागत आहे. मुसळधार पावसाच्या काळात ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

लाभार्थ्यांच्या मते, नगरपरिषद प्रशासनातील संबंधित विभाग आणि मुख्याधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे ही वेळ ओढवली असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधीही आता या प्रश्नाकडे पाठ फिरवत असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात आहे. निधी वितरणाबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संबंधित अधिकारी संपर्काबाहेर असल्याचे समजले.घरकुल योजनांतील निधी रखडल्याने गरीबांच्या स्वप्नातील हक्काचे घर अजूनही अपूर्णच राहिले असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.येत्या काही दिवसांत रखडलेला निधी तातडीने वितरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक माध्यमांतून जाहीरपणे देण्यात आला आहे.

________________________

“महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग आणि नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन-तीन वर्षांपासून अनेक लाभार्थी बेघर झाले आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन लाभार्थ्यांना न्याय द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला आहे.

राज नारायणकर (सामाजिक कार्यकर्ते पुर्णा)

——————————-

“माझे घरकुल तीन वर्षांपूर्वी मंजूर झाले. दोन वर्षांच्या कालावधीत एजन्सीमार्फत केवळ दोनच हप्ते मिळाले. त्यामुळे घराचे बांधकाम अर्धवट राहिले असून मागील दोन वर्षांपासून एकही हप्ता मिळालेला नाही. सध्या भाड्याच्या घरात राहावे लागत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने उर्वरित हप्ते तातडीने द्यावेत आणि संबंधित एजन्सीच्या कामाची चौकशी करावी.”

गोविंद केशव गायकवाड लाभार्थी अण्णाभाऊ साठे नगर पुर्णा

You cannot copy content of this page