भूकंपाच्या जोरदार धक्क्याने पूर्णा तालुका हादरला
हिंगोलीच्या शिरळीजवळ केंद्रबिंदू; रिक्टर स्केलवर ४.२ तीव्रता, परभणी-नांदेडपर्यंत हादरे
पूर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) :
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरळी गावाच्या उत्तरेस बुधवारी मध्यरात्री झालेल्या ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने पूर्णा तालुक्यासह हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना जोरदार हादरा बसला. मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी अचानक जमीन हादरल्याने नागरिकांची झोप उडाली. अनेक गावांतील नागरिक भीतीपोटी घराबाहेर धावत आले. मागील दोन ते अडीच महिन्यांतील हा दुसरा मोठा धक्का असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूगर्भ विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, वसमत तालुक्यातील मौजे शिरळी गावाच्या उत्तरेस सुमारे १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदविण्यात आला. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की अनेक ठिकाणी घरांतील भांडी, खिडक्या, दरवाजे आणि पत्र्यांची छपरे काही सेकंद जोराने हलल्याचे नागरिकांनी सांगितले.
शिरळी, पांगरा शिंदे, कुरुंदा तसेच वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपापूर्वी भूगर्भातून गूढ गडगडाटाचा आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर लगेचच जमिनीला जोरदार हादरा बसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.या भूकंपाचे परिणाम केवळ हिंगोलीपुरते मर्यादित न राहता पूर्णा तालुक्यासह परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांतही स्पष्टपणे जाणवले. अनेकांनी रात्रीच घराबाहेर येऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
प्राथमिक पाहणीनुसार पांगरा शिंदे व शिरळी परिसरातील काही जुन्या घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त नाही.दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी सतर्क राहावे, कोणतीही आपत्कालीन माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.











