उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ७ जुलैला परभणीत; शेतकरी संवाद मेळाव्यात साधणार संवाद
इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार मेळावा; विविध पक्षांतील दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे संकेत
परभणी, ता. ४ (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी दौरा निश्चित झाला असून मंगळवार, ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यास ते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, प्रवीण देशमुख, मदन लांडगे, बाळासाहेब पानपट्टे, माणिक पौंढे आदी उपस्थित होते.खा. जाधव म्हणाले की, शहरातील क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या या संवाद मेळाव्यास हजारो शेतकरी उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच व्यापारी, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांशीही ते चर्चा करणार आहेत.पक्षप्रवेशाबाबत बोलताना खा. जाधव यांनी परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपला प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासोबतच नवीन विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी महानगरपालिकेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच नटराज रंगमंदिर आणि नव्याने उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृहाच्या कामांसाठीही शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, आगामी काळात विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेतही खा. जाधव यांनी दिले. “माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येणार असून जिल्ह्यातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील,” असे त्यांनी सांगितले.











