दुध तापवताच दुधाचे झाले रबरसदृश पदार्थ

Spread the love

पुर्णा शहरातील प्रकार ;खाजगी दूध विक्रेत्यावर कारवाईची टांगती तलवार; एफडीए व पोलिसांकडून चौकशी सुरू

पुर्णा, ता. ९ (प्रतिनिधी) : अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या दुधात भेसळ झाल्याचा धक्कादायक प्रकार पुर्णा शहरात उघडकीस आला असून, विकत आणलेले दूध तापवल्यानंतर त्याचे रबरसदृश पदार्थात रूपांतर झाल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित दूध विक्रेत्याविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पुर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील संतोष भंगे यांचा मुलगा धारेश्वर भंगे याने बुधवारी (दि. ८) रात्री सुमारे ९ वाजता सराफा बाजार परिसरात स्टॉल लावून दूध विक्री करणारे गणेश भगवान बोबडे (रा. माटेगाव, ता. पुर्णा) यांच्याकडून ४० रुपये देऊन अर्धा लिटर दूध खरेदी केले.दूध घरी आणल्यानंतर ते तापविण्यास ठेवले असता काही वेळातच दुधाचे स्वरूप पूर्णपणे बदलले. दुधाऐवजी रबरसदृश घट्ट पदार्थ तयार झाल्याचे पाहून भंगे कुटुंबीय हादरले. हा प्रकार परिसरात वाऱ्यासारखा पसरताच नागरिकांनी संताप व्यक्त केला.घटनेची माहिती मिळताच संबंधित कुटुंबीयांनी तत्काळ स्थानिक पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अन्न भेसळ निरीक्षक विश्वंभर ठोंबरे, फौजदार आमेर चाऊस आणि पोलीस कर्मचारी चंद्रकांत पुदलवाड यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी केली. दरम्यान, दूध विक्रेता गणेश भगवान बोबडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास अहवालानंतर संबंधिताविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेमुळे पुर्णा शहरातील दूध विक्रीच्या व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खाजगी दूध विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या दुधाची व्यापक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या प्रकरणात एफडीएच्या अहवालाकडे आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page