बोरीत कृषी केंद्रासह तीन किराणा दुकाने फोडली
-बसस्थानक परिसरातील घटना
बोरी/प्रतिनिधी
येथील बसस्थानक परिसरात चोरट्यांनी तीन किराणा दुकाने व एक कृषी केंद्र फोडून गल्ल्यातील ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर घडली. दुकानाचे शटर व गल्ल्याचे लॉक तोडून ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिंतूर तालुक्यात बोरी बसस्थानक परिसरात जिंतूर – परभणी महामार्गावर चोरट्यांकडून पोलिसांना आव्हान देणारी ही धाडसी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ माने यांचे स्वराज कृषी केंद्र (५०००), महादेव सोनटक्के यांचे महादेव किराणा (५०००), माणिक भाग्यवंत यांचे भाग्यवंत किराणा (१५०००) आणि हर्षनंदन घोलप यांचे घोलप किराणा (१५०००) अशा प्रकारे एक कृषी केंद्र व तीन किराणा दुकानांमधून एकूण ४० हजार रुपयांची चोरी करण्यात आली आहे.
सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड व बीट जमादार शेख वसीम, शेख मोबीन, राजेश जटाळ, श्रीराम दंडवते, कोकाटे, कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर सहायक पोलिस निरिक्षक राम मुंजे यांच्या मार्गदर्शनात श्वान व फिंगरप्रिंट पथक दाखल झाले. परंतु श्वानास चोरट्यांचा मागोवा लागला नाही. परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत, उमेश चव्हाण व राम पौळ हे सीसीटीव्ही व इतर घडामोडींचे तपास कार्य करत आहेत. सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनात घटनेचा अधिक तपास चालू झाला आहे. पोलिसांनी या घटनेतील चोरट्यांचा लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत असून पोलिसांच्या या तपास कार्याकडे गावातील व्यापारी व नागरिक यांचे लक्ष लागले आहे.
-व्यापारी व नागरिकांकडून संताप
पोलिसांची रात्रीची गस्त, गायब झालेली वीज व पोलिसांना घटनास्थळी येण्यास झालेला विलंब या कारणांमुळे चोरी झालेल्या दुकानांचे मालक व काही सुजाण नागरिक यांनी संताप व्यक्त केला.
___________










