लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा

Spread the love

सेलू,दि.10(प्रतिनिधी) :

लग्नाचे आमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सेलूत उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
एका आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासवून लग्नाचे आश्‍वासन दिले. त्यानंतर लग्न झाल्याचा विश्‍वास निर्माण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार शहरातील एका लॉजमध्ये तसेच आरोपींच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींसह एका महिलेने तिला नकार दिला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गणेश परमेश्‍वर इंगोले, परमेश्‍वर बाबासाहेब इंगोले आणि अनिता परमेश्‍वर इंगोले (रा. सालगाव, ता. परतूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक अरुण नागरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पुंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे करीत आहेत.

You cannot copy content of this page