Shaktipeeth Highway आखाडा बाळापूर तालुक्यात मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध
आ. संतोष बांगर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर;मोजणी रोखली ; तणावाचे वातावरण;पथक रिकाम्या हाताने परतले
हिंगोली/आखाडा बाळापूर, ता. १३ (प्रतिनिधी) :
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी, आखाडा बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गुरुवारी(ता.१३) रोजी बऊर-कांडली परिसरात महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या कंपनी आणि महसूल विभागाच्या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध करत मोजणीचे काम रोखले.यावेळी शेतकऱ्यांसोबत आमदार संतोष बांगर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेत त्यांच्यासोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी गेल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.यावेळी मंडळ अधिकारी किरण पावडे, ग्राम महसूल अधिकारी प्रतीक सोनवणे, भूमिअभिलेख विभागातील कर्मचारी तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी आले होते. मात्र मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला.शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांना याबाबत माहिती दिल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोजणी थांबविण्याची भूमिका घेत संबंधित पथकाला परत जाण्यास सांगितले. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आपण आणि वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांनी सभागृहात आवाज उठविला असून, यापुढेही शासनस्तरावर महामार्ग रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.
पोलिस बंदोबस्तातही शेतकरी आक्रमक
मोजणीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र परिस्थिती तापत असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर मोजणीचे काम न करताच पथकाला परतावे लागले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, गजानन राठोड, सीताराम मस्के, प्रशांत शिंदे, पिराजी बेले, बालाजी जोगदंड, सुनील रिठे, वामन हिरवे, सागर वाढोणकर, गणपत काळे, शाम माने यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.











