परभणीच्या जिंतूरातील मंगल कार्यालयाला २५ हजारांचा दंड….

Spread the love

परभणीच्या जिंतूरातील मंगल कार्यालयाला २५ हजारांचा दंड….
जिंतुर पालीकेची कार्यवाही;लग्नसमारंभात 50 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती….

परभणी/प्रतिनिधीं
दोन दिवसांपूर्वी परभणी शहरातील धार रोडवरील एका फंक्शन हॉलला नियमबाह्य पद्धतीने विनापरवानगी गर्दी जमवल्या प्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची कार्यवाही महापालेकेने केली होती.ही घटना ताजी असतानाच जिल्ह्याच्या जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयातील एका लग्नसमारंभात ५० जणांपेक्षा जास्त लोक लग्नसमारंभात आढळल्याने मंगल कार्यालयास जिंतूर पालिकेने सोमवार ता.२२.ऱजी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी लग्नसमारंभासह इतर सर्व कार्यक्रमांत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकानी मास्कचा वापर सातत्याने करावा, असेही म्हटले आहे. जे नागरिक, मंगल कार्यालय, संयोजक सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरूध्द दंडात्मक कारवाईचे संकेतही यापूर्वीच दिले आहेत. मात्र, तरीही नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिंतूर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या लग्नसमारंभास ५०पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याचे नगर पालिका प्रशासनाच्या पाहणीतून दिसून आले. नगर पालिका प्रशासनाने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयास २५ हजार रुपयांचा दंड ठोठवला.
दरम्यान, नागरिकांनी गर्दी करू नये, सतत मास्क वापरावा, सॅनिटायझरने हात धुवावेत, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिंतूर नगर पालिकेचे मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.

You cannot copy content of this page