स्व.सितारामजी अप्पा एकलारे यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर संपन्न
श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिर; ५० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पूर्णा, ता. २५ (प्रतिनिधी) :
येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे मा.कार्ध्या़ध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक स्व. सितारामजी अप्पा एकलारे यांच्या सहाव्या स्मृतिदिना निमित्त महाविद्यालयाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

पुर्णा येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात रासेयोजने अंतर्गत मंगळवारी (ता. २५) स्व. सितारामजी अप्पा एकलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. गुरु नंदीकेश्वर शिवाचार्य महास्वामीजी होते. थॅलेसेमिया स्पोर्ट्स ग्रुपचे राज्य समन्वयक तथा संस्थापक अध्यक्ष इंजि. लक्ष्मीकांत पिंपळगावकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उत्तमरावजी कदम, ज्येष्ठ समाजसेवक साहेबराव अण्णा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,नगरसेवक संतोष एकलारे यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ. के. राजकुमार आदीं मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्व. सितारामजी अप्पा एकलारे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर एकलारे परिवाराच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याणनिधीत ११ हजारांचा निधी देऊ केला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात ५० हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून स्व.एकलारे यांच्या सामाजिक कार्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली.यावेळी प्रमुख वक्ते लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी रक्ताच्या थलेसेमिया आजारावर तसेच रक्तदान, रक्तदानाचे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी जिवन ज्योती रक्तपेढीचे साईनाथ चौधरी व त्यांच्या टिमने रक्त संकलनासाठी परिश्रम घेतले.दरम्यान महाविद्यालयात पार पडलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.गिरीष डावरे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ.प्रकाश भांगे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते











