पुर्णा पालीकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रक्रिया ठप्प.!
कानडखेडकरांना आरोग्याच्या समस्या; सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघमारे यांचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा
पूर्णा, ता. २४ (प्रतिनिधी) :
येथिल पूर्णा नगर परिषदेकडून कानडखेड येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली शहरातील कचरा टाकला जात असला तरी त्यावर कोणतीही योग्य प्रक्रिया अथवा विल्हेवाट लावली जात नसल्याचा गंभीर आरोप कानडखेड येथिल ग्रामस्थांनी केला आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, आठ ते दहा दिवसांत योग्य उपाययोजना न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर कचरा आणून टाकत जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघमारे सह ग्रामस्थांनी दिला आहे.

पूर्णा नगर परिषदेने सन २००५ मध्ये जवळच असलेल्या कानडखेड येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या उद्देशाने सुमारे पाच एकर जमीन करार पद्धतीने घेतली आहे.या ठिकाणी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येईल व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, अशी हमी पुर्णा पालीकेने दिली असताना प्रत्यक्षात मात्र असे काहीच होत नाही.गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूर्णा शहरातील घाण-कचरा, एक्सपायर झालेली औषधे, मृत जनावरे तसेच इतर अस्वच्छ पदार्थ टाकले जात असून, त्यावर कोणत्याही प्रकारची शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात नसल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांना विविध आजारांचा धोका निर्माण झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त होत असताना प्रत्यक्षात कचऱ्याची योग्य विल्हेवाट का लावली जात नाही, तसेच या निधीचा वापर नेमका कुठे व कसा झाला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, आठ ते दहा दिवसांच्या आत डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा ग्रामस्थ तोच कचरा नगर परिषद कार्यालयासमोर आणून टाकीत तीव्र जनआक्रोश आंदोलन करतील, असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघमारे यांच्यासह, अरविंद काळे,जलीलखान पठाण आदीं ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











