खा. संजय जाधव यांनी घेतली आंदोलनकर्त्या मनपा कर्मचार्‍यांची भेट

Spread the love

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न मार्गी लावणार -खा.जाधव

परभणी,ता.२५(प्रतिनिधी) : 
पाच महिन्यांपासून थकीत वेतनासह अन्य मागण्यांकरीता गेल्या पंधरा-सोळा दिवसांपासून बेमुदत आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून समन्वयाने मार्ग काढून देवू, असे ठोस आश्‍वासन शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी महानगरपालिकेच्या आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांशी मंगळवारी रात्री हितगूज करतेवेळी दिले.
महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या प्रांगणात गेल्या पंधरा-सोळा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांशी खासदार जाधव यांनी मंगळवारी रात्री भेट घेतली. त्यांच्याद्वारे थकीत वेतनासह जीएसटी अनुदानापोटीची फरकासह वाढीव रक्कम तसेच अन्य मागण्या ऐकून घेतल्या व या सर्व मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रविवार 30 ऑगस्ट रोजीच्या दौर्‍यातून भेट व बैठकी दरम्यान निदर्शनास आणून दिल्या जातील व या थेट भेटीतून मार्ग काढला जाईल, असे ठोस आश्‍वासन दिले.
कर्मचार्‍यांच्या या आंदोलनाने शहरवासीय बेचैन आहेत. ठिकठिकाणी साफसफाईसह अन्य गंभीर प्रश्‍न उभे राहीले आहेत. सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरने पूर्णतः चुकीचे आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांनी याही गोष्टीची दखल घेतली पाहिजे. पाच-पाच महिने वेतन थकीत रहावे ही ही गोष्ट चिंताजनक आहे. त्यात महापालिकेच्या पदाधिकार्‍यांसह आयुक्तांनी या बाबीचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. सरकारी अनुदानाच्या प्रतिक्षेत नेहमी राहण्याऐवजी महापालिकेचेसुध्दा उत्पन्न कसे वाढेल? या दृष्टीने सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजेत. दुर्देवाने त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत. मोठ्या प्रमाणावर कर वसूली थकीत आहे. मोठ मोठ्या थकबाकीदारांकडे मनपा कर्मचारी पोहोचत नाहीत. आयुक्तांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे. मोठ्या थकबाकीदारांना नोटीसा बजावून वसूली केली पाहिजे अन्यथा त्यांच्या विरोधातसुध्दा कारवाईचे हत्यार उपसले पाहिजे. तरच वसूलीस वेग येईल. अन्यथा मनपा आर्थिकदृष्ट्या खितपत राहील, असा इशाराही दिला. महापालिकेच्या अनेक मालमत्ता आहेत, संकुले आहेत. परंतु, वसूली होत नाही. गाळेधारकांच्या भाडेवाढीच्या प्रकरणातसुध्दा सामंजस्याने तोडगा निघत नाही. गाळेधारक भाडे भरावयास तयार असतांना त्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जात नाहीत. आजही काही मालत्तांमधील गाळेधारकांना नाममात्र भाडे आहे, ही गोष्ट निश्‍चितच केविलवानी आहे. महापालिका या दृष्टीने विचारसुध्दा करीत नाही, हे मोठे दुर्देव आहे.
पदाधिकार्‍यांसह आयुक्तांचीही नैतिक जबाबदारी आहे, भविष्यात मनपा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी या दृष्टीने पदाधिकार्‍यांसह प्रशासनाने काही रोखठोक निर्णय घेतले पाहिजेत. सर्वपक्षीय सदस्यांशी हितगुज करीत वसूली वाढविली पाहिजे. स्व उत्पन्न वाढल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही, हे ओळखले पाहिजे. महापालिकेने आता आपला गलथान कारभार थांबविला पाहिजे, अन्यथा हे शहर आणखीनच बकाल होईल, आधीच हे शहर सर्वार्थाने मागास आहे, असे खासदार जाधव यांनी नमूद केले.
यावेळी महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, आयुक्त नितीन नार्वेकर, गंगाप्रसाद आनेराव, अतूल सरोदे, डॉ. अनिल कांबळे, व्यंकट डहाळे यांच्यासह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page