Hingoli;दोन पोलीसांना मारहाण

Spread the love

हिंगोली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

हिंगोली,ता.२५/प्रतिनिधी;

(Hingoli police assault) : पोलिस मुख्यालयातील एका पोलिस कर्मचार्‍याने भांडण सोडविण्याचा  प्रयत्न केला असता त्याला मारहाण करण्यात आली. तसेच हिंगोली ग्रामीण  ठाण्यातील डायल ११२ वर कार्यरत असलेल्या  पोलिस कर्मचार्‍याला मारहाण केल्याने पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

या  बाबत पोलिस सुत्राने माहिती  अशी दिली की, अतुल बोरकर हे पोलिस मुख्यालयात  कार्यरत असून २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या  सुमारास मोटर सायकलवरून जात होते. यावेळी अकोला रस्त्यावर एका वाहनचालका सोबत वादावादीची घटना सुरु असल्याचे दिसून आल्याने त्यांनी वाहन थांबवून दोघांनाही समजावून सांगण्याचा  प्रयत्न केला. यावेळी गारमाळ भागातील शेख   छोटू यासह अन्य दोघांनी पोलिस कर्मचारी  अतुल बोरकर यांना शिवीगाळ करून गालावर, ओठावर व चाळ्यावर मारहाण  केली.

अचानक मारहाण झाल्याने ते प्रतिकार करू शकले नाही यामध्ये ते जखमी झाले. त्यांना तात्काळ  हिंगोलीच्या  शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर  पोलिसात  २५ ऑगस्टला  अतुल बोरकर यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून शेख छोटू यांच्यासह  अन्य दोघावर शासकीय कामात अडथळा  व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच प्रमाणे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यातील शरद दत्तराव नागुलकर हे २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या  सुमारास डायल ११२  यांच्या कक्षात कर्तव्यावर  उपस्थित  असताना दुपारी १ च्या  सुमारास लिंबाळा मक्ता शिवारामध्ये एका  वाहनाच्या  काचा  फोडण्यात  आल्याने मदतीची आवश्यकता असल्याचे डायल ११२ वर समजून आले. हि माहिती  मिळताच नागुलकर यांनी  काही कर्मचार्‍यांना सोबत घेवून घटना स्थळी पोहचले. सदर ठिकाणी गॅस सिलेंडरची वाहतुक करणार्‍या  एका वाहनाच्या काचा फुटलेल्या  दिसून आल्याने त्यांनी चौकशी केली. परंतु सदर ठिकाणी उपस्थित  असलेले  करण जिलान्या पवार रा.लिंबाळा मक्ता  याने नागुलकर यांना अचानक शिवीगाळ  केली असता त्यास समजावून सांगण्यात प्रयत्न केला.

पंरतु करण पवार  हा ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने त्याने मारहाण सुरु केली. या बाबतची माहिती हिंगोली ग्रामीण  पोलिस ठाण्याला मिळताच पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्यासह महिला  पोलिस उपनिरीक्षक  श्रीदेवी वग्गे, जमादार असलम गारवे यांनी घटनास्थळी  धाव घेवून करण पवार याला ताब्यात  घेतले.या प्रकरणात पोलिस कर्मचारी शरद  नागुलकर यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात  दिलेल्या  तक्रारीवरून करण पवार  याच्या विरुध्द शासकीय कामात  अडथळा  व मारहाण केल्या प्रकरणाचा गुन्हा  दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा  पुढील तपास असलम गारवे हे करीत आहेत

You cannot copy content of this page