विदर्भातून परभणीत जाण्या-येण्या-या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस बंदी.-जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
विदर्भातून परभणीत जाण्या-येण्या-या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस बंदी..
परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती अधिक गंभीर होऊ नये यादृष्टिने जिल्ह्यातून विदर्भात जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी व सार्वजनिक वाहतूकीस निर्बंध घातले असून कोणतेही वाहन जाण्या-येण्यास मज्जाव केला आहे. ज्या तातडीच्या सेवा-सुविधा असतील त्या विचारात घेऊन प्रवेश करण्यापूर्वीच त्यांची अँटिजन टेस्टींग बंधनकारक केली आहे. परभणी जिल्ह्याच्या सिमांवर विशेष चौकी लावण्यात आली असून त्याठिकाणी पोलिसांमार्फत निगराणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यास एसटी महामंडळाने सुरवात करत परभणी जिल्ह्यातील सर्वच स्थानकातून विदर्भात जाणारी एसटीची वाहतुक, फेऱ्या पूर्णतः बंद करण्याचे आदेश सर्व आगारप्रमुखांना दिले असून वाहतुक, फेऱ्या पूर्णतः बंद करण्यात येईल, अशी माहिती विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी दिली.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील वाहतुकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (दि.23) सायंकाळपासून निर्बंध जारी केले. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातून परभणीत जिल्ह्यात येणार्या व परभणी जिल्ह्यातून वरिल सर्व जिल्ह्यात जाणार्या खासगी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीस जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी प्रतिबंध जारी केले आहेत. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणीवर एसटी महामंडळाने भर दिला असून परभणी जिल्ह्यातील परभणीसह पाथरी, जिंतूर, गंगाखेड येथील आगारप्रमुखांसह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकातील अधिकार्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विदर्भातील विभागांशीही संपर्क साधला असल्याचेही श्री. जोशी यांनी म्हटले आहे.
विशेषतः परभणी स्थानकातून जाणार्या नागरपूर, अकोला, चंद्रपूर व बुलडाणा या एसटी तसेच जिंतूर स्थानकातून अमरावती, अकोला व पाथरी – अकोला या बसेसची वाहतुकही बंद करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातील सर्वच बसस्थानकांना नियमांचे पालन करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रवाशांनी मास्क घालूनच प्रवास करावा, सातत्याने सॅनिटायझरने हात धुवावेत, सोशल डिस्टसिंग पाळावेत, असेही आवाहन मुक्तेश्वर जोशी यांनी केले आहे.












