पूर्णा पोलिसांपेक्षा चोरटे वरचढ..?

Spread the love

२५ दिवसांत ८ चोरी-घरफोड्या; एकाही घटनेचा उलगडा नाही, तपासाची प्रगती शून्य;पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील माजी नगराध्यक्षांचे घरही फोडले; अवैध धंद्यांवरही नियंत्रण नसल्याचा आरोप

पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) :

    शहर व परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, मागील २० ते २५ दिवसांत चोरी व घरफोडीच्या तब्बल ८  घटना घडल्या आहेत. मात्र, यापैकी एकाही घटनेचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने पूर्णा पोलिसांच्या तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरीच्या घटना एकामागून एक घडत असताना  पोलीसांना मोकाट चोरट्यांना मात्र मागोवा ही काढता न आल्याचे चित्र आहे. त्यामुळे “पूर्णा पोलिसांपेक्षा चोरटेच वरचढ ठरत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.सातत्याने सुरू असलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांबद्दलचा विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या सर्व घटनांची तपास प्रगती जवळपास शून्य असल्याचा आरोप होत असून, पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी पूर्णेकरांकडून होत आहे.

       पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चोरट्यांनी पोलीसांना सळो की पळो करत शहरात चोरी व घरफोडीची मालिका सुरूच ठेवत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दि. २७ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत सिद्धार्थनगर येथील शिवगंगा अहिरे, पोलीस ठाण्याच्या गेटसमोरील रस्त्यावरील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुभाषसिंह ठाकूर यांचे घर, कानखेड येथील मारुती वैद्य व मारुती धोत्रे यांच्या घरात घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या.याशिवाय शहरातील महावीरनगर भागातील डॉक्टर लेन व महाराष्ट्र बँक परिसरात चोरट्यांनी धाडसी कारवाया केल्या. सुभद्रा ज्वेलर्स, शिवा झेरॉक्स, पलसिद्ध व कनिष्क ग्राहक सेवा केंद्र अशी चार दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. एका पाठोपाठ एक अशा घटना घडत असताना चोरट्यांना रोखण्यात आणि घडलेल्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप अपेक्षित यश आलेले नाही.या सर्व घटनांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच घडलेली घरफोडी. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुभाषसिंह ठाकूर यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याने “चोरटे पोलिसांना चकवत आहेत की पूर्णा पोलीसच चोरट्यांपुढे हतबल ठरत आहेत?” अशी चर्चा शहरात रंगली आहे. पोलीस ठाण्याच्या अक्षरशः तोंडावर घरफोडी होते आणि त्यानंतरही चोरट्यांचा माग काढता येत नाही, ही बाब पोलिसांसाठी आत्मपरीक्षण करण्याजोगी आहे.

चोरी रोखण्यात अपयश; अवैध धंदेही जोमात?

शहर व परिसरात चोरीच्या घटना वाढत असतानाच दारू, मटका, जुगार, गुटखा, अवैध गौण खनिज वाहतूक, वाळू तस्करी, नशेच्या औषधांची बेकायदेशीर विक्री व गांजा तस्करीसारखे प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा नागरिकांकडून केली जात आहे. दारू, मटका व गुटखा विक्रेत्यांवर काही कारवाया वगळता इतर अवैध धंद्यांवर प्रभावी अंकुश दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.त्यामुळे पोलीसांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याची चर्चा शहरात आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे असते? गुप्त माहिती यंत्रणा किती सक्रिय आहे? चोरटे एवढे बेधडक कसे झाले? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत.

उपमहारीक्षक उमाप यांनी लक्ष घालावे.

नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पुर्णा शहर व परिसरात होत असलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांचा तातडीने छडा लावण्यासाठी तसेच वाढता क्राईम रेट आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच प्रलंबित चोरीच्या सर्व गुन्ह्यांचा वरिष्ठ स्तरावर आढावा घेऊन तपासातील त्रुटी दूर कराव्यात आणि कामात निष्क्रियता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी होत आहे.

You cannot copy content of this page